कर्जत : प्रतिनिधी
डाक विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाल स्पर्श योजना’ अंतर्गत धाकोजीमहाराज विद्यालय, निमगाव धाकू येथे आयोजित कार्यक्रमात विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते योजनेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ढोकरीकर परिवाराच्या सामाजिक कार्याची आणि दातृत्वाची विशेष चर्चा झाली.
कर्जत नगरीच्या सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय विकासासाठी ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ या भावनेतून ढोकरीकर परिवाराने सातत्याने विविध उपक्रमांना हातभार लावला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी मियावाकी प्रकल्पाकरिता २० गुंठे जागा, अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा, शैक्षणिक क्षेत्रातील आयटीआय तसेच विद्यार्थीनी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यासारख्या विविध सामाजिक उपक्रमांत परिवाराने योगदान दिले आहे.
सध्या कर्जत येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पाराचे दगडी बांधकामही ढोकरीकर परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे. यासोबतच ‘स्नेहप्रेम’मधील गरीब, वंचित व निराश्रित मुलांच्या पाठीशीही या परिवाराने कायम मायेचा हात ठेवला आहे.
याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ढोकरीकर परिवाराने ‘स्नेहप्रेम’च्या मुलांसाठी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. या मदतीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
सामाजिक कार्य करताना प्रसिद्धीपेक्षा समाजोपयोगी योगदानाला महत्त्व देणाऱ्या ढोकरीकर परिवाराच्या या दातृत्वाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. दातृत्व, सामाजिक जाणीव आणि माणुसकीची जपणूक करणारे ढोकरीकर परिवाराचे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

