विजूकाका तोरडमल यांच्या आवाहनाला पर्यावरणप्रेमी व मित्रपरिवाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वृक्षसंवर्धनासाठी रक्कम जमा
कर्जत : प्रतिनिधी
वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. सर्व सामाजिक संघटना, कर्जत यांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला पर्यावरणप्रेमी आणि मित्रपरिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमातून तब्बल १ लाख १४ हजार ९८६ रुपये जमा झाले आहेत.
विजूकाका तोरडमल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मित्रपरिवार व पर्यावरणप्रेमींनी आर्थिक सहकार्य केले. जमा झालेल्या रकमेतून संघटनेच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.
सध्याच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ झाडे लावून न थांबता त्यांना नियमित पाणी देणे, त्यांची निगा राखणे आणि ती जगविणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“एकच येऊ दे ध्येय… झाडांचे जीवन वाचवूया!” या संदेशातून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या अमूल्य सहकार्याबद्दल विजूकाका तोरडमल यांनी सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देणारा हा उपक्रम इतरांसाठीही आदर्श ठरणारा आहे.
