
कर्जत:
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात सोमवारी कर्जत शहरात समस्त भीम सैनिक व सामाजिक संघटनांच्या वतीने ‘भव्य संविधान सन्मान जनआक्रोश मोर्चा व संविधान सन्मान सभा’ पार पडली. या मोर्चाला कर्जत तालुक्यातील आंबेडकरी जनतेचा व विविध संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मोर्चाची सुरुवात आक्काबाई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. तेथून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला, जिथे मोर्चाचे रुपांतर मोठ्या सभेत झाले. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची या जनआक्रोश मोर्चाला प्रमुख उपस्थिती लाभली.
आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध
अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणामुळे बहुजन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून, यामुळे समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” असा इशारा देत संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले.
विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा
या जनआक्रोश मोर्चाला समस्त ढोर समाज संघटना, कर्जत तालुका यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला. हातात निळे झेंडे घेऊन आणि संविधानाच्या सन्मानार्थ घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने भीम सैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाशी संबंधित अधिक माहितीसाठी Anandraj Ambedkar Morcha Video पाहू शकता.
