उपवर्गीकरणाच्या विरोधात कर्जतमध्ये जनआक्रोश; संविधान सन्मान मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्जत : प्रतिनिधी
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याला विरोध दर्शवत कर्जत तालुक्यातील भीमसैनिकांच्या वतीने सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) कर्जत येथे भव्य ‘संविधान सन्मान जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. आक्काबाई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक तसेच भीमसैनिक मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या हक्कांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण होऊ देणार नाही, अशी भूमिका सहभागी आंदोलकांनी व्यक्त केली. मोर्चामुळे कर्जत शहरातील वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले.
मोर्चानंतर तहसील कार्यालय परिसरात सभा घेण्यात आली. यावेळी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर कर्जतचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना उपवर्गीकरणाच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी संविधानाने दिलेले हक्क, सामाजिक समता आणि आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. शांततेच्या मार्गाने मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत प्रशासनाला आपली भूमिका स्पष्टपणे कळवली.
उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर निर्माण झालेली चिंता या मोर्चातून ठळकपणे समोर आली असून, आपल्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी संघटितपणे आवाज उठविण्याचा संदेश या जनआक्रोश मोर्चातून देण्यात आला.
