
कर्जत : प्रतिनिधी
आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यात भव्य तालुकास्तरीय सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, कर्जत शहर व तालुका यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या सायकल मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा मार्ग महात्मा गांधी विद्यालयासमोरील ग्राउंड, कर्जत येथून सुरू होऊन नियोजित मार्गाने पुन्हा महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर समाप्त होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीतील मुले-मुली यांना संधी देण्यात आली आहे. सहभागी विद्यार्थ्यांसाठी विविध आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली असून, सायकल, रिस्ट वॉच, स्मार्ट वॉच, स्पीकर आदी बक्षिसांचा समावेश आहे.
तरुणांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण व्हावी, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश पोहोचावा आणि विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
“खेळा, जिंका आणि पुढे चला…” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल मॅरेथॉनमध्ये कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
