गाईच्या गोठ्यात काम करत असताना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी; कर्जत पोलिसांत तक्रार
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथे गाईच्या गोठ्यात काम करत असलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत अज्ञात व्यक्तीने तिच्या अंगावरील अंदाजे अर्ध्या तोळ्याचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
अंबिजळगाव येथील भैरवनाथ मंदिराजवळ राहणाऱ्या उषाबाई कांतीलाल निकत रात्रीच्या सुमारास गाईच्या गोठ्यात काम करत होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याचा धाक दाखविला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील अंदाजे अर्ध्या तोळ्याचा सोन्याचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला आणि तेथून पसार झाला.
या घटनेनंतर उषाबाई निकत यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंद करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, गावातील वस्ती परिसरात रात्रीच्या वेळी अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणातील अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी, तसेच परिसरात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

