दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय
कर्जत : प्रतिनिधी
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेचे शुल्क माफ करण्यात आले आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्याबाबत विभागीय मंडळांना सूचना दिल्या आहेत.
राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये विशेष सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन परीक्षा आवेदनपत्रे भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही कार्यवाही पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.
दुष्काळामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरताना शुल्क आकारू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दुष्काळाच्या संकटात शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
