कर्जत : प्रतिनिधी
अळसुंदे, ता. कर्जत येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या महान कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमास स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण अनारसे, स्कूल कमिटी सदस्य भानुदास गार्डी यांच्यासह अळसुंदे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल अळसुंदेचे मुख्याध्यापक परहर आर. व्ही., शिक्षक व सेवकवर्गही यावेळी उपस्थित होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. ‘शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे’, हा कर्मवीरांचा विचार आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम पिढी घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात रुजवत, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कर्मवीरांच्या कार्याला अभिवादन आणि त्यांच्या विचारांना उजाळा देत उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळ्याची सांगता झाली.

