राशीनमध्ये सलग तीन दिवस विशेष प्रार्थनेचे आयोजन; समाधानकारक पाऊस पडून शेतीला नवसंजीवनी मिळावी, अशी भाविकांची आर्त विनवणी
राशीन (प्रतिनिधी) : पावसाच्या लहरीपणामुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या संकटातून बळीराजाची सुटका व्हावी, शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि सर्वत्र जलसमृद्धी नांदावी, या सद्भावनेतून राशीन येथील मुस्लिम समाजबांधवांनी सामूहिक दुवाचे आयोजन केले. या उपक्रमातून शेतकरी बांधवांच्या सुखसमृद्धीसाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्यात आली.
राशीन येथील काझीनगर परीटवाडी परिसरातील मदिना मकतब फाउंडेशनसमोरील मैदानावर दि. १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान सलग तीन दिवस दुपारी २ वाजता या विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पावसासाठी दुवा मागितली.
पावसाअभावी शेतीची कामे अडचणीत येत असून शेतकऱ्यांना पिकांच्या भवितव्याची चिंता सतावत आहे. अशा परिस्थितीत निसर्गाने साथ द्यावी, पावसाचे दमदार आगमन व्हावे, विहिरी, तलाव आणि नदी-नाले पाण्याने भरून जावेत, तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मिटावा, अशी भावना या प्रार्थनेतून व्यक्त करण्यात आली.
यावेळी मौलाना शहनवाज कुरेशी, मौलाना रहीम शेख आणि मौलाना उबेद काझी यांनी नमाज व दुवाद्वारे पावसासाठी प्रार्थना केली. मौलाना रहीम शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अल्लाहकडे दुवा मागितली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सामाजिक एकतेचा संदेश
शेतकरी हा समाजाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टावर संपूर्ण समाजाची भिस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी यावी, या भावनेतून हा धार्मिक उपक्रम राबविण्यात आला. पावसासाठी करण्यात आलेल्या या सामूहिक प्रार्थनेतून सामाजिक एकता आणि परस्पर सद्भावनेचाही संदेश देण्यात आला.
राशीन परिसरात समाधानकारक पाऊस पडून शेतीला नवसंजीवनी मिळावी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा आणि गावासह परिसरात समृद्धी नांदावी, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली
