गौरीच्या स्वागतासाठी महिलांची लगबग; सजावट, पूजासाहित्य व नैवेद्याच्या तयारीला वेग
कर्जत : गणेशोत्सवाच्या उत्साहात आता गौरी आगमनाची चाहूल लागली असून, कर्जत शहरासह परिसरातील घराघरांत गौरी-गणपतीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गौरीच्या आगमनामुळे परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, महिला वर्गामध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरांची स्वच्छता करून आकर्षक सजावट केली आहे. फुलांच्या माळा, रांगोळी, तोरणे तसेच आकर्षक विद्युत रोषणाईने घरे सजविण्यात येत आहेत. गौरीला पारंपरिक पद्धतीने साडी, दागिने व विविध अलंकारांनी सजविण्याची तयारी महिलांकडून करण्यात येत आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य, फुले, हार, फळे व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतही नागरिकांची लगबग वाढली आहे.
गौरी-गणपतीच्या सणानिमित्त विविध प्रकारचे नैवेद्य व पारंपरिक पदार्थ तयार करण्याची तयारी सुरू असून, घराघरांत उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातही गौरीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्याची तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, पावसाळी वातावरणाची साथ लाभत असल्याने सणाच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. गौरी-गणपतीच्या आगमनामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण असून, कुटुंबीय एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करण्याची तयारी करत आहेत.
गौरी-गणपती उत्सवाच्या निमित्ताने शहर आणि परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, आगामी दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे उत्सवाची रंगत आणखी वाढणार आहे.
