कोळी समाजाची ‘रणरागिणी’ म्हणून नावाजलेल्या दुर्गाताई माने आक्रमक; कृषिमंत्र्यांना निवेदन, चौकशीची मागणी
मोहोळ : प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील जाधव हायटेक नर्सरीकडून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप पुढे आला आहे. नर्सरीतून टोमॅटो तसेच अन्य पिकांची रोपे खरेदी करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी समाजसेविका तथा कोळी समाजाची ‘रणरागिणी’ म्हणून नावाजलेल्या दुर्गाताई माने यांनी केली आहे.
मंगळवेढा, पंढरपूर व मोहोळ परिसरातील काही शेतकऱ्यांनी जाधव हायटेक नर्सरीमधून रोपे खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, काही रोपे व्यवस्थित वाढली नाहीत, काहींची उगवण अपेक्षेप्रमाणे झाली नाही, तर काही शेतकऱ्यांना मागविलेल्या वाणाऐवजी वेगळ्या प्रकारची रोपे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर दुर्गाताई माने यांनी संबंधित नर्सरीला भेट देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारींची माहिती घेतली. नर्सरीचे मालक सचिन जाधव यांच्याकडेही याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण झाले नसल्याचा दावा माने यांनी केला आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दुर्गाताई माने यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन सादर केले. नर्सरीतील रोपांची गुणवत्ता, संबंधित नोंदी व इतर बाबींची कृषी विभागामार्फत तातडीने तपासणी करण्यात यावी. चौकशीत अनियमितता किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन कारवाई न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दुर्गाताई माने यांनी दिला आहे.
या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होणे बाकी असून, चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. संबंधित नर्सरीची बाजूही चौकशीदरम्यान समोर येणे अपेक्षित आहे.
