
कर्जत (विशेष प्रतिनिधी):
एककीडे अवर्षणाची टांगती तलवार आणि दुसरीकडे बळीराजावर आलेले संकट… अशा अत्यंत कठीण परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आणि पर्जन्यवृष्टीसाठी राशीन नगरीमध्ये एका अलौकिक भक्तीचा सोहळा पार पडला. राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या शतचंडी यज्ञ व महापूजा सोहळ्यात भाविकांनी दाखवलेली अथांग श्रद्धा, शिस्त आणि निष्ठा पाहून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
निसर्गाला साकडे घालणारा भाविकांचा ‘कडक’ संकल्प
या धार्मिक सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या हजारो भाविकांची निस्सीम भक्ती आणि समर्पण! स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे, तर ‘माझा बळीराजा सुखी होऊ दे आणि धरणीमाता तृप्त होऊ दे’ या उदात्त हेतूने राज्यभरातून आलेल्या भाविकांनी अत्यंत कडक नियमांचे पालन करत, दिवसभर अन्न-पाण्याचा त्याग करून यज्ञात आहुती दिली. उन्हाची आणि प्रवासाची कोणतीही पर्वा न करता, भाविकांनी दाखवलेला हा भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकी खरोखरच वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद ठरली.
राज्यभरातून जनसागर; राशीन नगरी दुमदुमली
श्री सद्गुरू समर्थ आध्यात्मिक केंद्र (अहिल्यानगर दक्षिण विभाग) आणि श्री जगदंबा देवी धार्मिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या महायज्ञासाठी कर्जत, मिरजगाव, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बारामती अशा विविध जिल्ह्यांतून तब्बल ३,००० हून अधिक महिला व पुरुष भाविक उपस्थित होते. मंत्रोच्चाराच्या गजर, शंखाचे नाद आणि “श्री स्वामी समर्थ” तसेच “आई जगदंबेचा” जयघोषाने संपूर्ण राशीन परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.
सेवाकऱ्यांचे अथक परिश्रम अन् उत्कृष्ट नियोजन
इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसागराचे नियोजन करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, राशीन येथील श्री स्वामी समर्थ सेवाकरी बंधू-भगिनींनी अत्यंत चोख, शिस्तबद्ध आणि कौतुकास्पद व्यवस्थापन केले. महापूजा, यज्ञकुंड व्यवस्था आणि महाप्रसादाचे वाटप या सर्व बाबी अतिशय कडक शिस्तीत पार पाडल्या.
“पाऊस भरपूर पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे” या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन भाविकांनी आणि सेवाकऱ्यांनी एकत्र येत घेतलेले हे कष्ट केवळ धार्मिक विधी नसून, निसर्गाप्रती आणि समाजाप्रती असलेल्या अथांग प्रेमाचे जिवंत उदाहरण ठरले आहे.
