नितीन तोरडमलांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या काळात प्रतिमाणसी सरसकट ४० लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख नितीन ईश्वर तोरडमल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्याच्या शासन निकषांनुसार पाणीटंचाईच्या काळात ग्रामीण भागासाठी प्रतिमाणसी २० लिटर, तर नागरी भागासाठी ३० लिटर पाणीपुरवठ्याची तरतूद आहे. मात्र, वाढती पाणीटंचाई आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेता हे निकष अपुरे ठरत असल्याचे तोरडमल यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे शासनाने निकषांमध्ये बदल करून ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांना प्रतिमाणसी किमान ४० लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
दुष्काळाच्या काळात नागरिकांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनतो. जनावरांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था करावी. तसेच पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक असून, सध्याच्या पाणीवाटपाच्या निकषांमध्ये बदल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहनही तोरडमल यांनी केले आहे.
या निवेदनाच्या प्रती विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या मागणीवर शासन काय भूमिका घेते, याकडे कर्जत तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
