
**राशीन | प्रतिनिधी**
करमाळा येथून चिंचोली काकडाटच्या दिशेने जात असताना बहिरोबावाडीजवळ बोलेरो आणि जेसीबी यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या अपघातात बोलेरो गाडीचे चालक अनिल गायकवाड (रा. गायकवाडवाडी, ता. कर्जत) हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडी आणि जेसीबी यांच्यात बहिरोबावाडीजवळ जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच गणेश यादव आणि भूषण तोरडमल यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून मदतीसाठी माहिती दिली.
माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाली. जखमी अनिल गायकवाड यांना तातडीने उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
**— दैनिक आवाज महाराष्ट्राचा**
