एकट्यानेच मदतीसाठी घेतली धाव; नागरिकांच्या तत्परतेमुळे सात कोपी वाचल्या, उसतोड कामगारांचे संसार राख
धांडेवाडी : प्रतिनिधी
धांडेवाडी येथे उसतोड कामगारांच्या कोपींना अचानक आग लागून तीन कोपी जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत संसारोपयोगी साहित्य, लहान मुलांचे कपडे, धान्य, तेल, मीठ यांसह सुमारे दहा हजार रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे कष्टकरी उसतोड कामगार कुटुंबांवर मोठे संकट ओढवले असून त्यांच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे.
आगीची घटना समजताच ‘कर्जत दर्शन’चे संपादक दिलीप अनारसे यांनी आग विझविण्यासाठी धडपड सुरू केली. आग पसरत असताना त्यांनी एकट्यानेच पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली. संकटाच्या प्रसंगी त्यांनी दाखविलेली तत्परता लक्षवेधी ठरली. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि तरुणांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे एकूण दहा कोपींपैकी सात कोपी वाचविण्यात यश आले; मात्र तीन कोपी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
या आगीत बाधित कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य, लहान मुलांचे कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कामगारांसमोर आता पुन्हा नव्याने संसार उभा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्या!
आगीच्या घटनेची संबंधित प्रशासन आणि साखर कारखाना व्यवस्थापनाने तातडीने दखल घ्यावी. घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच नुकसानग्रस्तांना धान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
संकटात माणुसकीचा हात!
संकटाच्या क्षणी दिलीप अनारसे यांनी दाखविलेली तत्परता आणि स्थानिक नागरिक व तरुणांनी केलेले प्रयत्न यामुळे आणखी मोठे नुकसान टाळण्यास मदत झाली. मात्र, संसारोपयोगी साहित्य गमावलेल्या उसतोड कामगारांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रशासन आणि साखर कारखाना व्यवस्थापनाने तातडीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. कष्टकरी कुटुंबांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून त्यांच्या संसाराला पुन्हा आधार देणे, हीच या संकटातील खरी माणुसकी ठरेल.
