जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी; कर्जत–राशीन मार्गावर भक्तिमय वातावरण
कर्जत : प्रतिनिधी
राशीन (ता. कर्जत) येथील प्रसिद्ध श्री जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात दाखल होत असून, ‘आई जगदंबा’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.
नवरात्रोत्सवातील पाचव्या माळेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या मंगलमय पर्वात भाविक जगदंबा मातेची पूजा-अर्चा करून तिच्या चरणी नतमस्तक होतात. मातेच्या दर्शनाने सुख, शांती, समृद्धी आणि कुटुंबाचे कल्याण लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पाचव्या माळेनिमित्त कर्जत शहरातून अनेक भाविक राशीन येथील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी पायी प्रस्थान करत आहेत. देवीवरील अपार श्रद्धा आणि भक्तिभावातून भाविक पायी प्रवास करून मातेच्या चरणी नतमस्तक होत आहेत. ‘आई जगदंबा’चा जयघोष करत राशीनच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या भाविकांमुळे कर्जत–राशीन मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक माळेला राशीनच्या जगदंबा मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून, पाचव्या माळेलाही भाविकांनी मातेचे दर्शन घेऊन सुख, समृद्धी, भरभराट आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. जगदंबा मातेवरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम या निमित्ताने अनुभवायला मिळत आहे.
