समर्थ नगरात शिक्षक दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून दिवसाढवळ्या चोरी; ८ ते ९ तोळे सोने व रोख रक्कम लंपास
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत शहरातील समर्थ नगर परिसरात शिक्षक दाम्पत्याच्या घरात दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अनिल सुभाष खंडागळे व त्यांची पत्नी शाळेत गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी घरातील कपाटातून अंदाजे ८ ते ९ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ५ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. शाळेतून घरी परतल्यानंतर खंडागळे दाम्पत्याला घराचे गेट उघडे असल्याचे तसेच मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्राथमिक माहितीनुसार, या चोरीच्या घटनेत दोन ते तीन चोरट्यांचा सहभाग असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
कर्जतकरांनी अधिक सतर्क राहण्याची गरज
दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे कर्जत शहरातील बंद घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी घर काही काळासाठीही बंद ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेजाऱ्यांना घराबाबत माहिती देणे, परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच मौल्यवान वस्तू आणि मोठी रोख रक्कम घरात न ठेवणे गरजेचे आहे.
दिवसा घरफोडीच्या या घटनेने कर्जतकरांना अक्षरशः सावध केले असून, ‘सावधानता हाच सुरक्षिततेचा पहिला उपाय’ ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणातील चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान कर्जत पोलिसांसमोर आहे.
