ओंकार शुगर इंडस्ट्रीला कारखाना विक्री झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर थकीत वेतन, शेअर्स व प्रॉव्हिडंट फंडाबाबत निवेदन; गुरुवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
करमाळा : प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी सभासद, आजी-माजी संचालक, कामगार, तोडणी-वाहतूक ठेकेदार व व्यापारी यांनी गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता करमाळा तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना ओंकार शुगर इंडस्ट्रीला विक्री केला असल्याची माहिती असल्याचा दावा या आवाहनातून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याशी संबंधित सभासद, कामगार व इतर घटकांच्या विविध मागण्यांबाबत तहसीलदार करमाळा यांना निवेदन देण्यात येणार आहे.
कारखान्याकडे असलेला शेअर्सचा भागभांडवल, अनामत तसेच वाहतूक ठेकेदारांची कारखान्याकडे असणारी बाकी, कामगारांचे थकीत वेतन आणि प्रॉव्हिडंट फंडातील रक्कम याबाबत संबंधितांनी मागण्यांचे निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आदिनाथ कारखान्याशी संबंधित सर्व सभासद, कामगार, आजी-माजी संचालक, तोडणी-वाहतूक ठेकेदार तसेच व्यापारी यांनी मोठ्या संख्येने करमाळा तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘चला करमाळा… चला करमाळा’ या घोषणेसह या बैठकीकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.
