सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती; आरक्षण व संविधानाच्या रक्षणासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
कर्जत : प्रतिनिधी
अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात कर्जत तालुक्यातील समस्त भीम सैनिकांच्या वतीने सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘भव्य संविधान सन्मान जनआक्रोश मोर्चा व संविधान सन्मान सभा’ आयोजित करण्यात आली आहे. आरक्षणाचे संरक्षण आणि संविधानाच्या सन्मानासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या मोर्चाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मोर्चाची सुरुवात कर्जत शहरातील आक्काबाई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून होणार आहे. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना होणार असून, तेथे निदर्शनांसह मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘संविधान सन्मान सभा’ आयोजित करण्यात आली आहे.
उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी तसेच आरक्षण व संविधानाच्या संरक्षणाचा संदेश देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘उपवर्गीकरण होऊ देणार नाही’ असा निर्धार व्यक्त करत तालुक्यातील भीम सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समस्त भीम सैनिक, कर्जत तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा असून, प्रशासनाकडूनही आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे.
