तक्रारी व प्रशासकीय वादांची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्याविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि प्रशासकीय वादांची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. दि. २५ सप्टेंबर २०२६ पासून पुढील कायदेशीर कारवाई निश्चित होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश २३ सप्टेंबर रोजी डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जायभाये यांच्याविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून खुलासे मागविण्यात आले होते. मात्र, काही प्रकरणांमध्ये सादर करण्यात आलेले खुलासे समाधानकारक नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी नगरविकास विभागाकडे केलेल्या तक्रारीचाही आदेशात संदर्भ आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक ३ च्या जलवाहिनीच्या कामात अडथळे निर्माण करणे, संबंधित विभाग व ठेकेदाराला काम बंद करण्याच्या धमक्या देणे तसेच ठेकेदाराकडून ५० लाख रुपयांची कथित खंडणी मागितल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणी मागविण्यात आलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आदेशात नमूद आहे.
दरम्यान, महसूल मंत्र्यांकडे प्राप्त तक्रारीत फ्लेक्सची विटंबना, वसुली विभागातील अनियमितता, अतिक्रमण प्रकरणांतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बांधकाम विभागातील अनागोंदीचे आरोप करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. याबाबत मागविण्यात आलेला खुलासाही जिल्हाधिकाऱ्यांनी अमान्य केला.
शासकीय कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणाबाबत जायभाये यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या होत्या. पुढील एक व दोन वार्षिक वेतनवाढ रोखण्याबाबतही त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. सात दिवसांची मुदत देऊनही लेखी खुलासा सादर करण्यात आला नसल्याचे आदेशात नमूद आहे. जायभाये हे परिविक्षाधीन मुख्याधिकारी असल्याने त्यांचा परिविक्षाधीन कालावधी वाढविण्याची शिफारसही विचाराधीन असल्याचे आदेशात म्हटले आहे.
नायब तहसीलदारांकडे अतिरिक्त पदभार
जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर कर्जत नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार कर्जत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार (संगायो) मोहसीन शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संबंधित आदेशाच्या प्रती नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, नगरपरिषद प्रशासन संचालक, महसूल मंत्र्यांचे खासगी सचिव, आमदार सुरेश धस आणि नाशिक विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत.
