इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या जाचक धोरणांविरोधात अहमदनगर येथे निषेध मोर्चा
अहमदनगर, दि. ३ ऑगस्ट २०२६ :इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या अनपेक्षित व जाचक धोरणांविरोधात आज अहमदनगर येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयावर कामगारांनी भव्य निषेध मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सहभागी झाले होते.
मोर्चाचे नेतृत्व कामगार संघटनेचे अध्यक्ष शंकर भैलूमे यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सहाय्यक आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे कामगार मंडळाच्या धोरणांमुळे कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध नोंदवून, जाचक अटी तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना अध्यक्ष शंकर बलुमे म्हणाले की, *”बांधकाम कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे निर्णय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. शासनाने आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा येत्या काळात यापेक्षाही अधिक व्यापक आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल.”*
मोर्चादरम्यान कामगारांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रशासनाने निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


