दैनिक आवाज महाराष्ट्राचा आवाजचा प्रभाव; कोरेगाव चौकातील रस्ता व गटरीचे काम तातडीने सुरू
कोरेगाव, प्रतिनिधी : स्नेहा जगताप
दैनिक आवाज महाराष्ट्राचा आवाज यांनी कोरेगाव चौकातील रस्त्याची दुरवस्था, चिखल, खड्डे आणि गटारीच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत रस्ता व गटरीच्या कामाला सुरुवात केली.
मागील काही दिवसांपासून कोरेगाव चौकातील रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल, खड्डे आणि वाहतुकीची गैरसोय निर्माण झाली होती. वाहनचालक, पादचारी तसेच व्यापाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर दैनिक आवाज महाराष्ट्राचा आवाज यांनी वृत्त प्रकाशित करून संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या वृत्ताची तातडीने दखल घेत संबंधित विभागाने रस्ता समतल करण्यासह गटरीचे काम हाती घेतले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत, लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल दैनिक आवाज महाराष्ट्राचा आवाजचे आभार मानले.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने हे काम दर्जेदार व कायमस्वरूपी पूर्ण करावे, तसेच भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली आहे.
